नवीन योजनेतून आणखी १० एमएलडी पाणी पाणीटंचाईचा गॅप कमी होणार; मिळणारे पाणी १७० ते १७५ एमएलडीवर

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरातील पाणीटंचाईची
तीव्रता कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेतून अखेर पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) नक्षत्रवाडी येथील मुख्य जलकुंभातून गुरुवारपासून अतिरिक्त १० एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी उचलण्यात येत आहे. यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यातील गॅप कमी होण्यास मोठी मदत होणार असून, 'मजीप्रा'ने राज्यातील ही सर्वात मोठी पाणी योजना यशस्वीपणे कार्यान्वित केल्याची माहिती मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून शहरासाठी २ हजार ७४० कोटी रुपये खर्चुन ही नवीन पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या योजनेची चाचणी सुरू झाली होती. जायकवाडी धरणातील जॅकवेल आणि तिथून नक्षत्रवाडीपर्यंतच्या ३८ किमी अंतराच्या मुख्य जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर, नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी आणण्यात आले. प्रयोगशाळेत पाण्याची काटेकोर तपासणी करून पाण्याचा गढूळपणा ३ अंशापेक्षा कमी झाल्यानंतरच हे पाणी वितरणासाठी सज्ज करण्यात आले.
नागरिकांना मिळणार दिलासा
१५ दिवसांपूर्वीच मजीप्राने जुन्या ७५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या योजनेतूनही १५ एमएलडी पाण्याची वाढ केली होती. यापूर्वी या पाईपलाईनमधून २६ एमएलडी पाणी मिळत होते. ही योजना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू असून, लवकरच यातूनही शहराला अधिकचे पाणी मिळणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याची पूर्ण प्रक्रिया करून प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच हे शुद्ध पाणी महापालिकेला देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना स्वच्छ आणि वाढीव पाणी मिळणार असल्याचे मजिप्राच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions